उमरगा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर आणि कणखर नेतृत्वावर विश्वास ठेवून, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासात्मक वाटचालीला पाठबळ देण्यासाठी, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील अनेक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.मुंबई येथील भाजपा कार्यालयात हा भव्य पक्षप्रवेश सोहळा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. या वेळी लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री बसवराज पाटील, लातूर-धाराशिव जिल्ह्याचे निरीक्षक किरण पाटील, भाजपा अनुसूचित जातीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दिलीप भालेराव आणि धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश आष्टे आदी मान्यवर उपस्थित होते.या सोहळ्याची सुरुवात अहमदपूरचे माजी आमदार बब्रुवान खंदाडे आणि माजी प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांचे निलंबन मागे घेऊन करण्यात आली. त्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पार पडला.पक्षप्रवेश करणाऱ्या प्रमुख मान्यवरांमध्ये लातूरचे काँग्रेस पदाधिकारी व माजी मनपा सभापती गिरीश पाटील, धाराशिव जिल्हा कमिटीचे उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे, उमरगा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. अक्षराताई सोनवणे, मंथन सुनील मिटकरी, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमृत पाटील आणि तालुका उपाध्यक्ष अमर सोनवणे यांचा समावेश आहे.या पक्षप्रवेश सोहळ्याला धाराशिव व लातूर जिल्हातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


