उमरगा :- कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथे येत्या २३ व २४ नोव्हेंबर रोजी भालकी हिरेमठ संस्थानचे डॉ. बसवलिंग पट्टदेवरू यांच्या दिव्य सान्निध्यात दोन दिवसीय राष्ट्रीय अनुभव मंटप उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
१२ व्या शतकात महात्मा बसवण्णा आणि ७७० शरणांनी अनुभव मंटपाची उभारणी केली. अनुभव मंटप हे जगातील पहिल्या लोकशाही संसदेचे प्रारूप मानले जाते. अनुभव मंटपात निर्माण झालेले वचन साहित्य मानवी जीवन सुखी आणि समृद्ध करणारे आहे. समता, स्वातंत्र्य, कायक, दासोह, सदाचार आणि सकल जीवात्म्यांचे कल्याण ही मूल्ये अनुभव मंटपाने जगाला प्रदान केली. या मूल्यांचे पुनर्जागरण घडविण्यासाठी गत ४४ वर्षांपासून राष्ट्रीय अनुभव मंटप उत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवात कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा अशा अन्य राज्यांतील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात.
बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण येथे आयोजित राष्ट्रीय अनुभव मंटप उत्सवाचे उद्घद्घटन शनिवारी (दि. २३) सकाळी ११ वाजता कर्नाटक राज्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मेघालयचे राज्यपाल सी. एच. विजयशंकर यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. के. एस. राजण्णा, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आणि लिंगायत स्वतंत्र धर्म अभ्यास समितीचे अध्यक्ष नागमोहन दास, महाराष्ट्र बसव परिषदेचे राज्य अध्यक्ष बी. एम. पाटील ( कोल्हापूर) आणि बसव टी. व्ही. चे संचालक ई. कृष्णप्पा या चौघांना अनुक्रमे डॉ. चन्नबसव पट्टदेवरू अनुभव मंटप, डॉ. एम. एम. कलबुर्गी साहित्य-संशोधन, बसव भास्कर आणि अनुभव मंटप असे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यातील डॉ. एम. एम. कलबुर्गी पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र आणि ५० हजार रुपये रोख असे आहे. अन्य तिन्ही पुरस्कार हे सन्मानपत्र आणि एक लाख रुपये रोख असे आहेत. उद्घाटनानंतर दुपारच्या सत्रात ‘लिंगायत आंदोलन पुढील दिशा’ हा परिसंवाद होणार आहे. यावेळी न्यायमूर्ती नागमोहन दास यांचे व्याख्यान होणार आहे. प्रा. आनंद कर्णे, विश्वाराध्य सत्यंपेटे यांची व्याख्याने आहेत. या परिसंवादात महाराष्ट्रात बसव विचार प्रसारांचे कार्य करणारे सचिन परब, वीरेंद्र मंगलगे, सचिन संगशेट्टी, प्रदीप बुरांडे, अभिषेक मिठारी, यश अंबोळे, सुदर्शन भुरे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. २४) सकाळी सामूहिक इष्टलिंग पूजा होणार आहे. त्यानंतर ‘बसवकल्याण विकास काल, आज व उद्या’ या परिसंवादात सिद्धप्पा मुलगे आणि प्रा. शिवशरण हुमणे यांची व्याख्याने होणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे क्रीडामंत्री संजय बनसोडे, रमेश अंबरखाने उपस्थित राहणार आहेत. दुपारी २ वाजता समारोप होणार आहे. यावेळी कर्नाटकचे उद्योगमंत्री डॉ. एम. बी. पाटील, सामाजिक न्यायमंत्री सतीश जारकीहोळी, वैद्यकीय मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील, मंत्री रहीम खान, ईश्वर खंडरे, बी. आर. पाटील उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध भाषांतील दहा पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. या उत्सवात वचन संगीत, वचन नृत्य आणि शरणांच्या जीवनावर आधारित ‘महाक्रांती’ नाटकाचे सादरीकरण होणार आहे. सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र बसव परिषदेचे पुणे येथील नरसिंग मुळे व उमरगा येथील देवराज संगुळगे, गुंडप्पा चौगुले, हनुमंत शंके यांनी केले आहे.