उमरगा पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी; CEIR पोर्टलच्या मदतीने गहाळ 15 मोबाईलचा शोध , मूळ मालकास अपर पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते परत

0
469

उमरगा :-  पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांकडून गहाळ झालेल्या विविध कंपन्यांच्या एकूण 15 मोबाईल फोनचा CEIR पोर्टलच्या माध्यमातून यशस्वी शोध घेण्यात उमरगा पोलिसांना मोठे यश मिळाले असून, सदर मोबाईल धाराशिव चे अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या हस्ते मूळ मालकांना दि.13 रोजी परत करण्यात आले.उमरगा शहर तसेच हद्दीतील गावांमध्ये आठवडा बाजार, प्रवासादरम्यान नागरिकांचे मोबाईल गहाळ होण्याच्या घटना घडल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे उमरगा पोलिसांनी CEIR पोर्टलच्या माध्यमातून सातत्याने लोकेशन ट्रॅक करत मोबाईल हस्तगत केले. दि. 13 जानेवारी 2026 रोजी पोलीस ठाणे उमरगा येथे झालेल्या वार्षिक तपासणीवेळी सदर मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले.मोबाईल प्राप्त झालेल्या नागरिकांमध्ये अश्विनी कांबळे, गजानन  बिराजदार, श्रीधर  लोहार, जगदेवी अस्तगे, महेश कदारे, हिराचंद मुळे, शुभम बोळगावे, संदीप  सुगावे, लक्ष्मी राजपूत, भाग्यश्री कांबळे, मिलिंद मुजगेकर, आकाश राठोड, योगेश सूर्यवंशी, प्रदीप भोसले व प्रविण गायकवाड यांचा समावेश आहे. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ही उल्लेखनीय कामगिरी धाराशिव च्या पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उमरगा उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, पो.हे.का. राजेश वादे व पो.को. संभाजी घुले यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे उमरगा पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, नागरिकांनी आपला मोबाईल गहाळ किंवा चोरीस गेल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन उमरगा पोलिसांकडून करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी उमरगा पोलीस सदैव तत्पर असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here