उमरगा शिवसेना (उबाठा) तालूका प्रमुख बाबुराव शहापूरे यांच्या कारचा अपघात

0
11472

उमरगा :- उमरगा – लोहारा विधानसभा मतदार संघाचे नुतन आमदार प्रविण स्वामी यांच्या सोबत शिवसेना प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीसाठी उमरग्याहून – मुंबई कडे जात असताना दि. 25 नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास इंदापूर च्या पुढे उमरगा तालुका प्रमुख व लोहारा तालुका प्रमुख ज्या कार मध्ये होते त्या कारचा अपघात झाला. यात बाबूराव शहापूरे (मामा) व अमोल बिराजदार  गंभीर जखमी झाले तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणधीर (भाऊ) पवार, ज्येष्ठ शिवसैनिक सुधाकर पाटील हे किरकोळ जखमी झाले असल्याची घटना घडली आहे.

अपघात झाल्यानंतर दुस-या कारमध्ये असलेले नुतन आमदार प्रविण स्वामी, बसवराज वरनाळे, शशिकांत पतगे यांनी  जखमीनां तात्काळ  भिगवण येथील रुग्णालयात प्रथमोपचार करीता दाखल केले. काहीवेळानंतर गंभीर जखमी असलेले बाबुराव शहापूरे (मामा) यांना पुणे येथील  हाडपसर येथे असलेल्या सह्याद्री हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात झाले तर अमोल बिराजदार यांना सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. किरकोळ जखमी झालेले रणधीर पवार ,सुधाकर पाटील यांना प्राथमिक उपचार करुन उमरग्याला पाठवण्यात आले असून, दुपारी 4.00 वाजेपर्यंत शहापूरे (मामा) यांच्या प्रकृतीत बर्‍याच प्रमाणात सुधारणा झाली असून, त्यांची प्रकृती सद्या उत्तम आहे तसेच  अमोल बिराजदार यांची प्रकृती ही उत्तम असल्याची माहिती सोबत असलेले शशिकांत पतगे यांनी दिली.

अपघात घडल्याच्या  क्षणापासून आमदार प्रविण  स्वामी ,बसवराज वरनाळे हे दिवसभर गंभीर जखमी झालेले बाबूराव  शहापूरे (मामा), अमोल बिराजदार यांच्या सोबत होते. अपघाताची माहिती मिळताच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी फोन करुन  बाबूराव शहापूरे ( मामा) व अमोल बिराजदार यांच्या तब्येती संदर्भात विचारपूस केली.तसेच धाराशिवचे खासदार  ओमराजे निंबाळकर,बाबा पाटील यांनी ही फोन करुन विचापूस केली. सदर अपघाताची माहिती कळताच पुणे येथे स्थायिक असलेले शिवसैनिक नितीन गावडे,महावीर जाधव,ओंकार शेवाळे,प्रविण कुन्हाळे, सिधाराम हत्तर्गे,सनी पाटील, हणमंत सुरवसे, आदी विचारपूस करण्याकरीता आले होते.अशी माहिती शशिकांत पतगे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here