लोहारा:- महाविद्यालयाच्या वतीने विद्यापीठ ध्वजाची रॅली काढण्यात आली. या रॅलीत प्रमुख पाहुण्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने सामील झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजारोहण करण्यात आले. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेषेराव जावळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशविरीत्या पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्याना पदवी प्रदान करण्यात आली. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अंकुश कदम, व्यवस्थापन परिषद सदस्य, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छ्त्रपती संभाजीनगर, रणजितसिंह कोळेकर, तहसीलदार लोहारा, ज्ञानेश्वर कुकलारे, पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन लोहारा, सौ.वैशालीताई अभिमान खराडे, नगराध्यक्षा नगरपंचायत, लोहारा, अविनाश हुमने, शाखा व्यवस्थापक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, लोहारा, वजीर अत्तार हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रमेश पाटील हे होते. डॉ.अंकुश कदम यांनी विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केल्यानंतर एकाच क्षेत्रात करीअर न करता आपल्या आवडीच्या क्षेत्रात कार्य केल्यास तो विद्यार्थी अधिक यशस्वी होऊ शकतो असे प्रतिपादन केले. रणजितसिंह कोळेकर यांनी स्पर्धा परीक्षा तयारीसाठी योग्य मार्गदर्शन, नियोजन व व्यवस्थापन, तसेच अथक परिश्र मामुळे विद्यार्थ्यांचे करीअर घडू शकते असे मत मांडले. ज्ञानेश्वर कुकलारे यांनी विद्यार्थ्याना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या, नोकरी व करिअरच्या संदर्भात जर प्रामाणिकपणे कष्ट केले तर निश्चितच यश मिळते व विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया मध्ये वेळ न घालवता अभ्यासाकडे जर लक्ष दिले तर निश्चितच फायदा होईल असे मत मांडले.प्रास्ताविक डॉ.मनोज सोमवंशी यांनी तर आभार प्रा.दत्ता कोटरंगे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी मनोज पाटील यांसह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.