धाराशिव:- येथील जिल्हा परिषदेच्या विशेष सभेचे दि.27 रोजी आयोजन करण्यात आले होते. या विशेष सभेत चार सभापतींची निवड करण्यात आली असून, महायुतीत भाजप पक्षाला दोन महत्त्वाचे सभापतीपद, राष्ट्रवादीला कृषी व पशुसंवर्धन तर शिवसेना शिंदे गटाला महिला व बालकल्याण सभापती पद याप्रमाणे महायुतीच्या घटक पक्षात समतोल राखण्याचा भाजपाचे तुळजापूरचे आमदार धाराशिव जिल्ह्यातील राजकारणातील हुकमी एक्का राणा जगजीत सिंह पाटील यांनी प्रयत्न केला आहे. घटक पक्षांना प्रतिनिधित्व देऊन न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कोणत्या पक्षाला किती वाटा मिळणार याबाबतची उत्सुकता संपुष्टात आली आहे. धाराशिव जिल्हा परिषद च्या समाजकल्याण सभापतीपदी विश्वास कोकणे (भाजप), कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी भाऊसाहेब खरसडे (राष्ट्रवादी), महिला व बालकल्याण सभापतीपदी पूजा शिंदे (शिवसेना) तर अर्थ व बांधकाम सभापतीपदी सिद्धेश्वर कोरे (भाजप) यांची निवड करण्यात आली असून ,या निवडीमुळे महायुतीतील प्रमुख घटक पक्षांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न दिसून आला.
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर तुळजापूरचे भाजपचे आमदार तथा जिल्ह्याचे भाजपाचे वरिष्ठ नेते राणा जगजीत सिंह पाटील यांच्या सौभाग्यवती अर्चना पाटील यांची अध्यक्षपदी तर माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या सौभाग्यवती उषा गायकवाड यांची उपाध्यक्षपदी यापूर्वीच निवड झाली असून, सभापती पदांसाठी विविध इच्छुकांकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. अखेर दि.27 रोजी च्या विशेष सभेत सर्व चर्चांना पूर्णविराम देत चारही सभापतींची अधिकृत घोषणा करण्यात आली.महाविकास आघाडीकडूनही सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र सभेत झालेल्या मतदान प्रक्रियेत महायुतीच्या उमेदवारांचा ४५ – १० च्या फरकाने विजय झाला. या पदवाटपामुळे जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरण आता पूर्णपणे स्पष्ट झाले असून, आगामी काळात विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


